खिळा!
खिळा हा माणसानं लावलेला एक अत्यंत अद्भुत शोध आहे! कदाचित चाक आणि शून्याच्या शोधाइतकाच अद्भुत, पण त्यांच्याहून जास्त टोकदार!
कोणत्याही दोन वस्तूंना एकत्र 'खिळवून' ठेवणाऱ्या गोष्टीला खिळा म्हणतात. धातूसा छोटासा तुकडा असतो तो. एका बाजूला धारधार टोक आणि दुसऱ्या बाजूला 'डोकं' असलेला. त्याचा शोध कधी लागला, कोणी लावला माहित नाही. पण गेली किमान चार-पाच हजार वर्षं खिळा आपल्या आयुष्यात आहे!
खिळ्याच्या धाकट्या बहिणीला चुक म्हणतात आणि गिरक्या घेणाऱ्या मधल्या भावाला स्क्रू (माफ करा, स्क्रू ला मराठी शब्द नाही!). खिळा आणि चुकेच्या डोक्यावर हातोड्याचे घण घालावे लागतात, पण स्क्रूला मात्र डोक्यात स्क्रूड्रायव्हर अडकवून जोर लावून पिळावं लागतं! मात्र तिन्हींची फलश्रुती एकच, कोणत्याही दोन गोष्टींना एकत्र खिळवून ठेवणे!
खिळा ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ज्या गोष्टीमध्ये खिळे नीट मारलेले नसतात ती गोष्ट लवकरच खिळखिळी होते!
खूप महत्वाचा असला तरी, खिळा ही खुळ्या माणसानी हाताळायची गोष्ट नाही! जिथे मारायचा आहे त्या विविक्षित ठिकाणी खिळा ठेवून त्यावर हातोडीचे नेमके घाव मारणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. 'जाssनी, इसमे नोक है, लग जाये तो खून निकल आता है' वगैरे लक्षात ठेवावं लागतं वर्षानुवर्षांची साधना लागते हे साधण्यासाठी!
पण ही साधना एकदा साधली गेली की घराचा दरवाजा दुरुस्त करण्यापासून ते 'भिंतीवरी' असाव्याच अशा कालनिर्णयसाठीच्या खिळ्यापर्यंत कोणत्याही कारणासाठीचे खिळे आपल्याला ठोकता येतात, चपला-बुटांना चुका मारता येतात, बिजागऱ्यांच्या कानांत स्क्रू पिळता येतात...
चालणं, बोलणं, पोहणं, सायकल चालवणं ह्यांच्यासारखीच 'खिळा ठोकू शकणं' हीसुद्धा आयुष्यातली अत्यंत महत्वाची क्षमता आहे.
ती जमते तेंव्हा निखळ आनंद मिळतो, जमत नाही तेंव्हा दातखिळ बसू शकते...
आयुष्यामध्ये 'कळा ह्या लागल्या जीवा' जेवढं महत्वाचं असतं तेवढंच, 'खिळा हा ठोकला भावा' ही महत्वाचं असतं,
हे इतकंच समजलं तर आपलं आयुष्य खिळखिळं होत नाही!!
- प्रसाद शिरगांवकर
Comments
Post a Comment